![]() |
|
फळ प्रक्रिया उद्योग
|
विविध प्रकारच्या फळे व भाज्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थ करतांना त्यातील रसाचे व गराचे प्रमाण, साखर व आम्लतेची माहिती असणे अत्यंत गरजेचे असते. महत्वाची फळे व भाज्यामधील रसाचे / गराचे प्रमाण, एकूण विद्राव्य घटक व आम्लतेचे प्रमाण खालीलप्रमाणे तक्त्यात दिलेले आहे.
विविध फळातील रस/गर, साखर व आम्लतेचे प्रमाण:
१. डाळिंबापासून अनारदाना
अनारदाना प्रामुख्याने आंबट जातीच्या डाळिंबापासून करतात. पिकलेल्या डाळिंबाचे दाणे उन्हात वाळवून त्यापासून अनारदाना बनवितात. परंतु आपणाकडे उपलब्ध असलेल्या कमी आंबटजाती उदा. गणेश, मूदुला पासूनसुध्दा चांगल्या प्रकारे अनारदाना करता येऊ शकतो. याकरिता प्रथम डाळिंबाची फळे निवडून ती स्वच्छ धुवून, साल काढून, दाणे वेगळे करावेत. नंतर १ किलो डाळिंबाच्या दाण्यात ५० ग्रॅम सायट्रीक आम्ल मिसळून ते सूर्यप्रकाशात ३ ते ४ दिवस किंवा कॅबिनेट ड्रायरमध्ये ५५-६० अंश से. तापमानाला १४ ते १६ तास सूकवावे. तयार झालेला अनारदाना प्लॅस्टिक पिशव्यात भरुन त्याची साठवण किंवा विक्री करावी.
२. ऑस्ट्रेलियन डिपींग ऑईल पध्दतीने द्राक्षापासून मनुके तयार करणे
या पध्दतीत पक्व द्राक्ष घडाची निवड करुन ती स्वच्छ पाण्याने धुवून घेवून, फळे इथाईल ओलीएट (२० मि.लि. प्रति लिटर) आणि पोटॅशिअम कार्बोनेट (२.४ ग्रॅम प्रति लिटर) यांच्या मिश्र द्रावणात ४-५ मिनीटे ठेवावीत. नंतर फळे ड्रायरमध्ये ५५-६० अंश से. तापमानास किंवा सावलीत सुकवावीत. या पध्दतीने तयार केलेले मनुके शीतगृहात साठवावेत म्हणजे मनुके काळे पडत नाही.
३. आवळा कॅन्डी
आवळ्याची कॅन्डी करतांना पूर्ण पिकलेली मोठी किंवा मध्यम आकाराची रसदार फळे निवडावीत. फळांना प्रथम उकळत्या पाण्याची प्रक्रिया ८-१० मिनिटे देऊन त्यामधील बिया आणि काप वेगळे करावेत. अर्धवट शिजविलेल्या फळांवर बोटाचा दाब दिल्यावर फळाच्या पाकळ्या बियांपासून सहजपणे वेगळ्या करता येतात. वेगळे केलेले काप प्रथम ५० डिग्री ब्रिक्स असलेल्या साखरेच्या पाकात २४ तास ठेवावेत. १ किलो फोडीसाठी ३०० मि.ली. पाण्यात ३०० ग्रॅम साखर मिसळून ५० डिग्री ब्रिक्सचा पाक तसेच त्यात १ टक्के सायट्रीक आम्ल मिसळावे. दुसऱ्या दिवशी पाकातील ब्रिक्सचे प्रमाण साधारणपणे २५-३० एवढे कमी होतो त्यामध्ये ३५० ते ४०० ग्रॅम साखर मिसळून त्याचा ब्रिक्स ६० डिग्री करावा. तिसऱ्या दिवशी त्याच पाकात ५०० ते ६०० ग्रॅम साखर मिसळून त्याचा ब्रिक्स ७० डिग्री करावा. पाचव्या दिवशी त्याच पाकात १५० ते २०० ग्रॅम साखर घालावी.आणि ७ व्या किंवा ८ व्या दिवशी पाकात मुरलेल्या पाकळ्या बाहेर काढाव्यात. पाकात प्रथमपासूनच २ टक्के आल्याचा रस किंवा विलायची पूड मिसळल्यास तयार होणाऱ्या कॅन्डीला आल्याची किंवा विलायचीची मधुर चव येते. कॅन्डी तयार झाल्यावर पाण्यात झटपट धुवून घ्यावी किंवा मलमलच्या कापडाने कोरडी करावी आणि नेहमीच्या तापमानास खोलीत ३-४ दिवस स्वच्छ टेबलावर सुकवावी. सुकलेली कँन्डी प्लॅस्टीकच्या पिशवीत भरुन हवाबंद करावी म्हणजे ती वर्षभर टिकू शकते.
४. टुटीफ्रुटी
बोर आणि कच्च्या पपईपासून टुटीफूटी तयार करतात. त्याच प्रमाणे बोरांपासूनसुध्दा अशी टुटीफुटी तयार करता येते. त्यासाठी उमराण, कडाका यासारख्या आकाराने मोठ्या असणाऱ्या बोराचे वाण वापरतात. या टुटीफ्रुटीचा उपयोग विविध प्रकारचे केक, फुटब्रेड, श्रीखंड, फ्रुट सॅलॅड, आईसक्रीम मध्ये करता येतो. बोरा-पासून टुटीफुटी करतांना प्रथम पूर्ण पक्व, पिवळसर बोरफळ निवडून, ती पाण्याने धुवून, त्यातील बिया काढून त्याचे लहान लहान तुकडे करावेत. नंतर या तुकड्यांना उकळत्या पाण्याची ३-४ मिनिटे प्रक्रिया देवून ५०% साखरेच्या पाकात हवा तो नैसर्गिक रंग टाकून १ दिवस ठेवतात. नंतर त्या पुढील प्रक्रिया कॅन्डीप्रमाणेच करुन उत्तम प्रतीची टुटीफ्रुटी मिळविता येते.
५. फळांपासून वाईन
द्राक्ष, डाळिंब, बोर, पेरु, सिताफळ, जांभूळ, अननस, संत्री इत्यादी फळांपासून वाईन तयार करण्याबाबतचे प्रयोग विद्यापीठाच्या अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागात करण्यात आले आहेत. द्राक्षापासून वाईन तयार करण्यासाठी निरोगी व ताजी द्राक्षफळे निवडून, स्वच्छ धुवून त्याचा रस काढावा. या रसाचा ब्रिक्स २३ डिग्री व आम्लत्ता ०.७ टक्के ठेवावी. त्यामध्ये अमोनियम सल्फेट ०.५% आणि पोटॅशियम डाय हायड्रोजन फॉस्फेट ०.१% टाकावे. हे मिश्रण काचेच्या चंबूत किंवा फ्लास्कमध्ये ७० अंश से. तापमानास ३० मिनिटे ठेवावे. थंड झाल्यानंतर या मिश्रणात ५ टक्के सॅकॅरोमायसिस सिव्हिसी हे मुरवण वापरावे. शेवटी या मिश्रणाचा ब्रिक्स ३ ते ४ डिग्री एवढा कमी झाल्यानंतर आंबविण्याची क्रिया थांबवावी. आंबविण्याची क्रिया २६ अंश से. तापमानास साधारणपणे ८ ते १० दिवसात पुर्ण होते व त्यामध्ये साधारणपणे ९ ते १० टक्के अल्कोहोल तयार होऊन वाईन तयार होते. आंबविण्याची क्रिया पुर्ण झाल्यावर ते मिश्रण मलमल कापडातून एक आठवड्याच्या अंतराने चारदा गाळून घ्यावे. चार वेळेस शेवटी त्यात ४०० मिग्रॅ/लि. बेन्टोनाइट टाकून वाईन सेंट्रीफ्युज करावी म्हणजे स्वच्छ वाईन तयार होते. तयार झालेली स्वच्छ वाईन १५१६ अंश सें. तापमानास चार महिन्यापर्यंत ठेवावी. या क्रियेला मॅच्युरेशन असे म्हणतात.
६. चिंचेपासून प्रक्रियायुक्त पदार्थ
महाराष्ट्रात चिंचेचे उत्पादन फार मोठ्या प्रमाणात होते. टरफले, शिरा आणि चिंचोके काढून टाकलेल्या पक्व चिंचफळांपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. यामध्ये फळांचा गर आणि पावडर या पदार्थास मोठी मागणी आहे. फळांपासून गर काढण्यासाठी चिंचफळे १:१.५ (फळे:पाणी) या प्रमाणात पाण्यात सहा तास भिजत ठेवावे. नंतर मिश्रण पल्पर मशिनमधून काढल्यावर गर मिळतो. चिंचेचा गर साठविण्यासाठी १ किलो गरात ६५० मिली ग्रॅम सोडियम बेन्झोएट टाकून, ८० अंश सें. तापमानास ३० मिनिटे गरम करुन नंतर योग्य आकाराच्या कॅन किंवा बाटल्यात भरतात. त्या कॅन किंवा बाटल्या ७० अंश से. तापमानाला २० मिनिटे तापवून मशिनच्या सहाय्याने डबल सिल करुन साठवितात. चिंचेचे १ लिटर सरबत करण्यासाठी १०० ग्रॅम गर घेवून, गरातील साखर गृहीत धरुन उरलेली साखर (११८ ग्रॅम) टाकून त्याचा ब्रिक्स १५ डिग्री करावा व आम्लता टारटारीक आम्लाच्या (१ ग्रॅम) सहाय्याने ०.४ टक्के करावी व उरलेले पाणी (७८० मि.ली.) वापरुन सरबत करावे. एक लिटर सिरप करण्यासाठी २५० ग्रॅम गर घ्यावा. गरातील साखर व आम्लता गृहीत धरुन उरलेली साखर (१७० ग्रॅम) व टारटारिक आम्ल (१० ग्रॅम) टाकून त्याचा ब्रिक्स ६५ डिग्री व आम्लता १.२ टक्के करुन उरलेले पाणी (५७० मि.ली.) टाकून सिरप बनवावे. सिरप वापरतांना एक ग्लास सिरप अधिक चार ग्लास पाणी मिसळून सरबत करावे. सिरपची साठवणक्षमता अधिक असते.सॉस तयार करण्यासाठी गराची आम्लता खाण्याच्या सोड्याच्या सहाय्याने कमी करुन १ किलो गरात एकूण वापरावयाच्या साखरेच्या (४८ ग्रॅम) १/३ साखर टाकावी. नंतर मसाल्याचे पदार्थ (कांदा ४० ग्रॅम, लसूण ४ ग्रॅम, मिरची पूड १.५ ग्रॅम, लवंग, दालचिनी, जायपत्री, इलायची, काळेमिरी) पातेल्यात पुरचुंडी बांधून गरात बुडवून तरंगत ठेवावी व गर तिसऱ्या हिश्यापर्यंत उष्णतेच्या सहाय्याने आटवावा.गर आटवत असतांना पळीने पुरचुंडीला हळूवारपणे अधुन मधून सतत हलवावे म्हणजे मसाल्याचा अर्क गरात एकजीव होईल. नंतर गरात मीठ (२५ ग्रॅम), पेक्टीन (५ ग्रॅम) व राहिलेली साखर टाकून पुन्हा थोडा वेळ शिजवावे (ब्रिक्स ३२ डिग्री) शेवटच्या टप्प्यात व्हिनेगार (९५ मिली.) टाकून तयार झालेला सॉस निर्जंतुक बाटल्यात भरुन तो साठवावा.
७. सुके अंजीर
अंजीरापासून उत्तम प्रतीचे सुके अंजीर करण्याकरिता पिवळसर पक्व दियान्ना अंजीर फळे (२५% किंवा त्यापेक्षा जास्त विद्राव्य घटकाचे प्रमाण असलेली ) निवडून स्वच्छ पाण्याने धुवून त्यांना वाफेद्वारे (१० पी.एस.आय.) ५ मिनिटे वाफवून, ते ड्रायरमध्ये ५५ ते ६० अंश से. तापमानाला १८ ते २० तास सुकवावीत. अंजीर फळांत एकूण विद्राव्य घटकाचे प्रमाण २५% पेक्षा कमी असल्यास ती फळे वरीलप्रमाणे वाफवून, ५०% परावर्तित साखरेच्या पाकात २४ तास ठेवून नंतर ती ड्रायरमध्ये ५५ ते ६० अंश सें. तापमानाला १८ ते २० तास सुकवावीत.
८. टोमॅटो केचप
टोमॅटो केचप तयार करण्यासाठी रस ३ किलो, कांदा ४० ग्रॅम, लसूण ३ ग्रॅम, लवंग, दालचिनी, जायपत्री, वेलची, काळे मिरे, मिरचीपुड प्रत्येकी २ ग्रॅम, मीठ ३० ग्रॅम, साखर १५० ग्रॅम व व्हिनेगार १०० मि.लि. वापरावे. प्रथम रस पातेल्यात घेवून त्यात एकूण साखरेच्या १/३ साखर टाकावी. सर्व मसाल्याचे पदार्थ जसेच्या तसे मलमल कापडात बांधून त्याची पुरचुंडी बांधावी. ही पुरचुंडी पातेल्यात रसामध्ये बुडवून तरंगत ठेवावी. पातेले मंद शेगडीवर ठेवून मुळ रसाच्या तिसऱ्या हिश्यापर्यंत आटवावा. रस आटवत असताना पळीने पुरचुंडीला हळूवारपणे अधून मधून सतत दाबावे म्हणजे मसाल्याचा अर्क रसात एकजीव होईल. त्यानंतर राहिलेली साखर, ३५ मिली व्हिनेगार टाकून रस पुन्हा मुळ रसाच्या १/३ आकारमान येईपर्यंत आटवावा. हॅन्ड रिफ्रक्टोमिटरच्या सहाय्याने त्याचा ब्रिक्स मोजल्यास तो २८ डिग्री इतका येतो. तयार झालेल्या केचपमध्ये प्रति किलो ७०० मि. ग्रॅम सोडियम बेन्झोएट व व्हिनेगार टाकून एकजीव करावे. केचप अगोदर निर्जंतुक केलेल्या ५०० ग्रॅम किंवा १ किलो आकाराच्या बाटल्यात भरुन, क्राऊनकॉर्क मशिनच्या सहाय्याने झाकणे लावून हवाबंद करुन थंड व कोरड्या जागी साठवाव्यात.
९. बटाटा वेफर्स
वेफर्स तयार करण्यासाठी मध्यम आणि गोल आकार असलेले ताजे, पांढरे व टणक बटाटे निवडावेत. बटाट्याच्या कंदात कमीतकमी साखरेचे प्रमाण असल्यास उत्तम प्रकारचे वेफर्स तयार करता येतात. त्याकरिता खास वेफर्ससाठी निर्माण केलेल्या चिपसोना नं. १ व चिपसोना नं. २ या नवीन जातींच्या बटाट्यांचा वापर करावा. शीतगृहात साठविलेले बटाटे असल्यास ते वेफर्स करण्यापूर्वी नेहमीच्या तापमानास ८-१० दिवस ठेवावेत. बटाटे प्रथम पाण्यात धुवून स्वच्छ धुवून नंतर यंत्राच्या सहाय्याने संपूर्ण साल काढून हातमशिन किंवा चिप्सच्या यंत्राचा वापर करुन १ मि.मि. जाडीचे काप करावेत. हे काप ५ टक्के मिठाच्या द्रावणात साठवावेत. तळण्यास घेताना हे काप स्वच्छ पाण्यात धुवून घ्यावेत व लगेच उकळत्या रिफाइंड तेलात तळावेत. साठवणीत, मऊ पडलेले तसेच आतील भाग पिवळसर पडला असेल तर अशा बटाट्यांचे काप तळण्यापूर्वी ५ टक्के मीठ आणि ०.२५ टक्के कॅल्शियमक्लोराईड किंवा तुरटीच्या द्रावणात २०-३० मिनिटे बुडवून ठेवावेत. वेफर्स तळत असताना तेलाच्या पृष्ठभागावर येताच किंवा कढईतून बाहेर काढल्यावर त्यावर लगेच ५ टक्के मिठाच्या पाण्याचा फवारा मारल्यास उत्तम प्रतिचे खारे वेफर्स तयार होतात. याशिवाय, वेगवेगळ्या मसाल्याच्या मिश्रणाचा अर्क काढून तो फवारल्यास विविध चव व रंग असलेले वेफर्स तयार करता येतात. बटाट्याचे काप करताना विविध प्रकारचे साचे वापरुन साधे, प्लेन किंवा डिझाइनचे काप केल्यास वेफर्सच्या आकारात आणि चवीत विविधता आणता येते. वेफर्स थंड झाल्यावर प्लॉस्टिकच्या पिशव्यात बाजारभाव आणि मागणीप्रमाणे वजनाचा विचार करुन भरावेत. अशाप्रकारे तळलेले चिप्स बंद पिशवीत साधारपणे १५-२० दिवसांपर्यंत उत्तम राहतात.वेफर्स जास्त काळ बंद पिशवीत राहिल्यास त्यामधील तेलाचे विघटन घडून येते व वेफर्सला एक प्रकारचा उग्र खवट वास येतो. ते टाळण्यासाठी आणि वेफर्स दिर्घ काळ साठविण्यासाठी वेफर्स तळण्यापूर्वी ते ०.१ टक्का बीएचओ + ०.१ टक्का बीएचटी सारखी अॅन्टीऑक्सीडन्टस् मिसळावीत. तसेच पिशवीत पॅक करताना स्वयंचलित सिलींग यंत्राचा वापर करुन पिशव्यात वेफर्सबरोबर नत्र वायू भरुन पिशव्या हवाबंद कराव्यात. असे वेफर्स २ ते ३ महिन्यापर्यंत टिकतात.
१०. पालेभाज्या सुकविणे
पालेभाज्या शक्यतो ताज्या स्वरुपात वापराव्यात. परंतु पालेभाज्या सुकवून साठवता येतात व गरजेप्रमाणे त्यांचा वापर दैनंदिन आहारात करता येतो. सर्वसामान्यपणे पालेभाज्या सुकवून टिकविण्याकरिता त्यांची निवड करुन (स्वच्छ करणे, काड्या वगैरे काढणे) त्या पाण्यात धुऊन त्यांना कोमट पाण्यात (१ लिटर पाण्यात सायट्रीक आम्ल १ ग्रॅम, मीठ १० ग्रॅम, सोडीयम कार्बो नेट १ ग्रॅम, पोटॅशियम मेटाबाय सल्फाईड ०.१ ग्रॅम, मॅग्नेशियम ऑक्साइड १ ग्रॅम) टाकून ४० अंश से. तापमानाला ३० सेकंद ठेवतात. नंतर त्या ड्रायरमध्ये ४५ अंश से. तापमानाला १२-१४ तास सुकवून त्याची प्लास्टिकच्या पिशव्यांत हवाबंद करुन साठवण करतात. सुकलेल्या भाज्यांची किचन ग्राइंडरमध्ये दळून पावडर करता येते.
११. लोणचे
कारल्याचे काप करुन त्यामध्ये लिंबू, हिरवी मिरची व नेहमीचा मसाला वापरुन उत्तम प्रकारे मिश्र लोणचेही करता येते.त्यासाठी १ किलो कारल्याचे काप, २५० ग्रॅम लिंबाच्या फोडी, १०० ग्रॅम देठविरहीत उभ्या कापलेल्या हिरव्या मिरच्या, २५० ग्रॅम लिंबाच्या लोणच्याचा तयार मसाला, २५० मि.ली. शेंगदाण्याचे तेल, १५० ग्रॅम मीठ, ५ ग्रॅम हळद, १० ग्रॅम लसून पाकळ्या याचा वापर करावा.
तृणधान्य प्रक्रिया
यामध्ये गहू, मका, तांदूळ, ज्वारी, बाजरी, रागी इत्यादींचा समावेश होतो. गव्हापासून पीठ, मैदा, रवा, ब्रेड, केक, बिस्कीटसह, शेवया इ. पदार्थ तयार करता येतात. तसेच सालीपासून तांदूळ, पोहे, चिवडा इ. व मक्यापासून स्टार्च, पोहे, फ्रुक्टोज सिरप, लाह्या इ. आणि ज्वारी, बाजरी, रागी यापासून अनेक प्रकारचे घरगुती प्रक्रीया अन्नपदार्थ तयार केले जातात.
विकसित तंत्रज्ञान
१. कोंडाविरहीत नाचणी पिठापासून पोषणमुल्ययुक्त उत्तम प्रकारच्या कुकीज तयार करण्यासाठी मैदा व नाचणी पीठ यांचे ७० व ३० टक्के या प्रमाणात वापर करण्याची शिफारस करण्यात येत आहे.
२. मोहाच्या वाळलेल्या फुलापासून उत्तम प्रतीचे मद्य तयार करण्यासाठी खालील प्रमाणे प्रक्रिया करण्याची शिफारस करण्यात येते.
* फुले मिक्सरमध्ये बारीक करुन त्यात ६ पट पाणी टाकून द्रावण ८० अं. सें. तापमानास ३० मिनीटे उकळून फुलातील साखर (१५ ब्रिक्स) द्रावणात उतरवणे. द्रावणात साखर घालून २४ ब्रिक्सचे द्रावण तयार करणे.
* वरील द्रवणात सॅकरोमायसीस सरेव्हेसी यीस्टचे ४ % मुरवन व ०.०७% अमोनियम सल्फेट मिसळून २० अं. सें. ला १० दिवस आंबविणे.
* बेन्टोनाईटचा (४०० मि.ली./लिटर प्रति आठवडे ४ आठवड्यापर्यंत) वापर करणे.
* ४ सेल्सिअस तापमानास १० दिवस साठविणे.
* गाळून घेवून बॉटलमध्ये साठविणे.
३.उत्तम प्रकारची आवळी कॅन्डी अल्प काळात (४ दिवसात) तयार करण्यासाठी खालील पद्धतीची शिफारस करण्यात येते.
* फोडी ७० ब्रिक्स पाकामध्ये निर्वात वातावरणात १५ मिनीटे ठेवून नंतर २४ तास मुरविणे त्यानंतर पाकाचा परत ७००ब्रिक्स करुन फोडी निर्वात वातावरणात १० मिनीटे ठेवणे.
* ४८ तासानंतर पाक व फोडी वेगळ्या करणे.
* सावलीत २ दिवस सुकविणे.
४. कोंडाविरहीत नागलीचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी नागली स्वच्छ करुन ६ मिनीटे प्रेशर कुकरमध्ये वाफाळून त्यानंतर
* ट्रे ड्रायर मध्ये ६० अं. सें. ला ५ तास वाळवावे.
* त्यानंतर २% पाण्याचा शिडकावा देवून त्याचा ढिग करावा आणि १ तास ठेवावे.
५ .पुना जातीच्या अंजिरापासून लेदर करण्यासाठी अंजीराच्या गरातील सुरुवातीस असलेले १९% साखरेचे प्रमाण वाढवून २५% आणि आम्लला ०.५% करुन सदरील गर ६० से. ला ८ तास वाळवून त्यास प्रेस करुन पोळी एवढी जाडी आल्यानंतर पोळीचे तीन थर एकावर-एक ठेऊन परत त्यास दाब देऊन ते ६० ला १५ ते १६% जलांशाचे प्रमाण येईपर्यंत (१२ तास) ड्रायरमध्ये वाळवून त्याचे लहान काप करुन पॉलिथिन पॉऊचेसमध्ये सामान्य तापमानास ६० दिवस आणि थंड वातावरणात ९० दिवसापर्यंत चांगल्या प्रकारे साठवता येते.
६.अद्रकापासून सुंठ तयार करण्यासाठी अद्रकाला ८ तास पाण्यात भिजवून त्यानंतर ६ तास ३% चुन्याच्या निवळीच्या द्रावणात बुडवून १२ तास गंधकाची धुरी देऊन परत याच प्रक्रिया दुसऱ्यांदा देऊन ट्रे ड्रायरमध्ये ५५° से. ला वाळवून चांगल्या प्रकारची सुंठ तयार होते. वाळवलेल्या सुंठीचे उत्पादन १८ ते २१% आणि पावडरचे उत्पादन १५ ते १७% मिळते.
७. बन्सी जातीच्या (गोदावरी) गव्हापासून उत्तम प्रतीच्या लाह्या तयार करण्यासाठी पुढीलप्रमाणे प्रक्रिया शिफारस करण्यात येत आहे.
* गहू ३ दिवस पाण्यात भिजवल्यानंतर उकळत्या द्रावणात (खाण्याचा सोडा व मीठ प्रत्येकी १.५ टक्के) १ तास ठेवावे व नंतर १२ ते १४ टक्के ओलावा येईपर्यंत वाळवावे.
* पूर्व प्रक्रिया केलेल्या गव्हापासून २२० ते २४० सेल्सीयस तापमानास लाह्या तयार कराव्यात.
* लाह्यांपासून चिवडा तयार करून प्लास्टिकच्या पिशवीत सामान्य तापमानास १ महिना साठविता येतो.
८. माल्टोडेक्सट्रीचा वापर करून बीटा कॅरोटीनच्या कणावर आवरण केल्यास, बटाट्याचा स्टार्च आणि जिलेटीन पेक्षा उत्तम आवरण क्षमतेमुळे (७५%) आणि कमी खर्चात ६० दिवसांपर्यंत बीटा कॅरोटीन तापमानास साठविण्यासाठी माल्टोडेक्सट्रीनच्या सुक्ष्मावरणाची शिफारस करण्यात येत आहे.
९.कांद्याच्या फुले सफेद वाणापासून उत्कृष्ठ प्रतीचे, अधिक उत्पादन (८७%) आणि पाणी शोषण क्षमता असलेले (१:६) वाळवलेले काप मिळविण्यासाठी खालील पध्दतीचा अवलंब करावा अशी शिफारस करण्यात येत आहे.
* कांद्याचे २.५ ते ३.५ मि.मि. जाडीचे काप करावे.
* कापांना ०.२% पोटॅशियम मेटाबायसल्फाइटची प्रक्रिया देऊन ते वाळवणी यंत्रात (ड्रायरमध्ये) ५५ अंश से. तापमाणास ८ ते ९ तास वाळवावेत.
* काप सामान्य तापमानास ९० दिवसांपर्यंत सुस्थितीत साठविण्यासाठी लॅमिनेटेड परिवेष्ठनाचा वापर करावा. १०. लोह (४ मि.ग्रॅ./ १०० ग्रॅ.) आणि बीटा कॅरोटीन (२.५ मि.ग्रॅ./१०० ग्रॅ.) युक्त उत्कृष्ठ प्रतीची कुकीज करण्याकरीता
खालील पध्दतीचा आवलंब करावा अशी शिफारस करण्यात येत आहे.
* बाजरीच्या धनशक्ती जातीचे ४०% पीठ व ६०% मैदा आणि ४% मायक्रोएनकॅप्सुलेटेड बीटा कॅरोटीनचा वापरकरावा.
* कुकीज ६ महिन्यापर्यंत चांगल्या स्थितीत राहण्यासाठी लॅमिनेटेड परिवेष्ठनाचा वापर करावा.
१०. लोह (४ मि.ग्रॅ./ १०० ग्रॅ.) आणि बीटा कॅरोटीन (२.५ मि.ग्रॅ./१०० ग्रॅ.) युक्त उत्कृष्ठ प्रतीची कुकीज करण्याकरीता
खालील पध्दतीचा आवलंब करावा अशी शिफारस करण्यात येत आहे.
* बाजरीच्या धनशक्ती जातीचे ४०% पीठ व ६०% मैदा आणि ४% मायक्रोएनकॅप्सुलेटेड बीटा कॅरोटीनचा वापर करावा.
* कुकीज ६ महिन्यापर्यंत चांगल्या स्थितीत राहण्यासाठी लॅमिनेटेड परिवेष्ठनाचा वापर करावा.११. १०० टक्के राजगीरा पिठापासून ग्लुटेन विरहित, उच्च लोह, कॅल्शीअम व तंतूमय पदार्थ आणि उत्तम साठवणूक क्षमता असणाऱ्या (९० दिवस) फुले राजगिरा या जातीच्या कुकीज तंत्रज्ञानाची शिफारस करण्यात येत आहे.
उच्च प्रतिचे मोडासहित सुकविलेले हुलग्याचे माल्ट करण्याकरीता फुले हुलगा या जातीच्या माल्ट तंत्रज्ञानाची शिफारस करण्यात येत आहे.
* हुलगे पाण्यात स्वच्छ धुवून त्याच पाण्यात ०.१ टक्का के.एम.एस. (पोटॅशियम मेटाबाय सल्फेट) टाकून १२ तास भिजवावे. दर चार तासांनी हुलगे स्वच्छ धुवून घ्यावे.
* शेवटी हलगे स्वच्छ धुवून मोड येण्याकरिता इन्क्युबेटरमध्ये ३० डिग्रीसें. तापमानाला २४ तास ठेवणे.
* वाळवणी यंत्रात (ड्रायरमध्ये) ६० डिग्रीसें. तापमानाला १.५ तास वाळवावे.
* मोडासहीत सुकविलेले हुलगे सामान्य तापमानाला ९० दिवसापर्यंत सुस्थितीत राहते आणि त्यापासून उत्तम प्रतिची उसळ तयार करता येते.
१३. लोहयुक्त उत्तम प्रकारचा केक तयार करण्यासाठी गव्हाच्या मैद्यात (फुले समाधान) ३० टक्के अधिक लोह असणाऱ्या धनशक्ति बाजरीच्या पिठाचा वापर करण्याची शिफारस करण्यात येत आहे.
१४. अत्यावश्यक ओमेगा-३ व ६ फॅटीॲसिडयुक्त कुकिज करण्यासाठी १० टक्के हाळीव तेल व ९० टक्के वनस्पती तुपाचा वापर करून त्या अल्युमिनियम पाकिटात ९० दिवसांपर्यंत साठविण्याची शिफारस करण्यात येत आहे.
१५. १००% राळं वापरून कॅल्शियमयुक्त उत्तम साठवणूक क्षमता (९० दिवस) असणाऱ्या राळं कुकीजच्या तंत्रज्ञानाची शिफारस करण्यात येत आहे.
१६. ड्रॅगन फळाच्या गरापासून उत्तम प्रतिची जेली तयार करण्यासाठी खालील पध्दतीची शिफारस करण्यात येत आहे.
* फळांचा गर काढून गर आणि पाणि १:१ या प्रमाणात मिसळून ते २०-३० मिनिटे उकळल्यानंतर मलमल कापडाने गाळून घ्यावे.
* गाळलेल्या १ किलो अर्कात ५५० ग्रॅम साखर, ११ ग्रॅम पेक्टीन, २ ग्रॅम सायट्रीक आम्ल, ३०० मिली.ग्रॅम पोटॅशियम
मेटाबाय सल्फाईट (केएमएस) टाकून मिश्रण ६७ डिग्री ब्रिक्स येईपर्यंत शिजवावे.
* तयार झालेली जेली गरम असतानाच निर्जंतूक केलेल्या प्लॅस्टिक (PET) बाटल्यात भरून थंड केल्यानंतर त्या सीलबंद कराव्यात. सामान्य तापमानास ९० दिवसापर्यंत जेली सुस्थितीत राहते.