![]() |
|
पॉलीहाउस
|
जागतिक फुल मार्केटमध्ये कार्नेशनचा दुसरा नंबर लागतो. सर्व जगभर मागणी आहे. वजनान हलकी, काटक, हळुवार उमलणारी, काढणीनंतर जास्त दिवस टिकणारी आहेत. पॉलीहाउसमध्ये कार्नेशनच दोन वर्षापर्यंत चांगल उत्पादन घेता येत. स्टँडर्ड कार्नेशन आणि स्प्रे कार्नेशन स्टँडर्ड असे दोन प्रकार आहेत. आपल्याकडे स्टँडर्ड कार्नेशनची लागवड केली जाते. पांढऱ्या, लाल-पिवळ्या, गुलाबी, भगव्या रंगांच्या फुलांना मागणी जास्त आहे.भरपूर सूर्यप्रकाश थंड-कोरडे हवामान मानवत. उत्तम निचऱ्याची जमीन पॉलीहाउससाठी निवडावी लागते. शेणखत + बारीक वाळू-लाल पोयाट्याच्या मातीने जमीन सपाट करून घ्यावी. त्यानंतर, याच मिश्रणाने १०० से. मी. रुंद आणि ४० से. मी. उंचीचे गादीवाफे तयार करावेत. दोन गादीवाफ्यात ५० से. मी. अंतर ठेवावे. यानंतर पॉलीहाउसमध्ये तापमान-नियंत्रण, आर्द्रता नियंत्रण आणि पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन यंत्रणा तयार करावी. याचबरोबर पॉलीहाउसमध्ये टाकलेल्या मातीचा आणि गाडीवाफ्याच १०० प्रति. चौ. मीटर क्षेत्राला १० लिटर फॉरमॅलीन वापरून निर्जंतुकीकरण करून घ्यावे.अशा प्रकारे तयारी केल्यानंतर गाडीवाफ्यावर दोन रोपातल अंतर १५ से. मी. ठेवून रोपाची लागवड खोलवर करू नये. रोपाच्या पिटचा १/४ भागच खड्ड्यांत लावावा. बाकीच्या ३/४ भागाला माती लावावी. लावताना आणि नंतर आठवडाभर पॉलीहाउस बंद ठेवावे. लागवड करताना काही मुद्दे लक्षात ठेवावेत.
* गादिवाफ्यासाठी चांगल्या प्रतीची लाल माती + शेणखत वापराव. यात भाताचं तूस वापरण्यास विसरू नये.
* गादीवाफे फॉरमॅलीनन निर्जंतुक करून घ्यावेत आणि पाण्याने धुऊन घ्यावेत.
* निर्जंतुकीकरण केल्यावर १५ दिवसांनी वापसा आल्यावर रोपाची लागवड करावी.
* गादीवाफ्यावर ठीबकच्या लॅटरल – उपनळ्यांची मांडणी करून घ्यावी.
* लागण झाल्यानंतर बुरशीनाशक द्रावण रोपांना द्यावे.
* लागणीपूर्वीच आधारासाठी पहिल्या दोन जाळ्या बसवून घ्याव्यात.
* तीन आठवडे हलकेसे पाणी द्यावे.
रोपांना आधार देण्यासाठी जी-आय तारेच्या ४ जाळ्या एकावर एक बसवून घ्याव्यात म्हणजे रोपांना चांगला आधार देता येतो. जाळीच्या प्रति चौ. मीटर क्षेत्रात कार्नेशनची ४० रोपे बसतात. पाणी ठिबकन रोज १० ते १५ मिनीट द्यावे. ४० ते ८५% आर्द्रता असावी लागते. कार्नेशनची लागवड केल्यानंतर १५ ते २५ से. मी. उंचावर ३-४ आठवड्यांनी रोपांचा शेंडा खुडावा. त्यामुळे बाजूच्या फुटव्यांची वाढ होते आणि इकाच रोपावर अनेक फुले घेता येतात. शेंडा खुडल्यानंतर बाविस्टीकची फवारणी करावी. शेंडा खुडनिबरोबरच शेंद्याकडची मुख्य कळी ठेवून बाकीच्या उपकळ्या खुडून टाकाव्यात म्हणजे फुल चांगल पोसत. कळी खुडण्याचे काम सतत कराव लागत. प्रति १०० चौ. मीटर क्षेत्राला लागवडीच्या वेळी १२:६:१८ ५ किलो, कॅल्शियम नायट्रेट २.५ किलो, मॅग्नेशियम सल्फेट २.५ किलो, बोरॅक्श पावशेर आणि १९:१९:१९ २०० ग्रॅम वापरावे. महिन्या-दोन महिन्यांनी याच खताच प्रमाण कमी करून हप्ते द्यावेत. विद्राव्य स्वरुपात ठीबकद्वारे हि खाते द्यावीत.
मर आणि खोडकुजीसाठी २ ग्रॅम रिडोमिल तसेच बाविस्टीन २ ग्रॅम + १ लिटर पाणी याचा ड्रेचिंग कराव. कोम्बकुज आणि पानावरच्या ठीपक्यासाठी २ ग्रॅम कॅप्टन, तसेच डायथेन एम ४५ १ ग्रॅम + १ लिटर पाणी यांच्या द्रावणाच्या फवारण्या कराव्यात. मावा फुलकिडे, लाल कोळी, कळी पोखरणारी अळी, सुत्रकृमी यांच्या नियंत्रणासाठी १५ मि. लि. न्युआन, १.५ मि. लि. अंबुस, १ मि. लि. डायकोफॉल आणि ४० ग्रॅम निमकेक अगर ३ मि. लि. सुझान + १ लिटर पाणी याची फवारणी करावी.
कळीच्या रंगछटा दिसू लागताच जमिनीपासून २० से. मी. अंतरावर दांड्यासह फुलांची काढणी करावी. सिल्वर थायोसल्फेट याचा पाण्यामध्ये वापर करून त्या बादलीत खुलांचे दांडे ठेवावेत. दोन दोन दिवसांनी काढणी करावी. प्रति चौ. मीटरला २५० फुलांचे उत्पादन मिळत.
काढणीनंतर रंग, दांड्याची लांबी, आकारमान, अवस्था अशा बाबीचा विचार करून प्रतवारी करावी. २० फुलांचा बंच करून त्याला शीत गुंडाळावे. बंच कोरुगेटेड बॉक्समधून बाजारात पाठवावेत. ५०० चौ. मी. (५ गुंठे) क्षेत्रफळाच्या पॉलीहाउस उभारणीसाठी + कार्नेशन लागवडीसाठी ४ ते ४.५ लाख रुपये खर्च येतो. खर्चवजा जाता पहिल्या वर्षी कार्नेशनपासून १ लाख, तर दुसऱ्या वर्षी ५ लाखांपर्यंत निव्वळ नफा मिळू शकतो.
साठवण कशी करावी?
काढणी केल्यानंतर फळे आणि भाज्यांमध्ये काही अंतर्गत जैविक आणि रासायनिक क्रिया अखंडपणे चालू असतात. या क्रियामध्ये बाष्पीभवनाची क्रिया, पिकण्याची क्रिया इत्यादिंचा समावेश होतो. या क्रिया साठवणुकीच्या तापमानाशी संबंधित असतात. कमी तापमानाला या क्रियांचा वेग मंद होतो. सुक्ष्म जंतूंच्या प्रादुर्भावामुळे फळे आणि भाजीपाला खराब होतो. प्रत्येक फळांची आणि भाजीपाल्यांची साठवण त्यांच्या गरजेनुसार ठराविक तापमानाला आणि ठराविक सापेक्ष आर्द्रतेला शीतगृहात करावी लागते. त्यामुळे फळांचे आणि भाज्यांचे आयुष्य वाढते. उदा. आंब्यांची फळे १२-१३ अंश से. तापमानाला आणि ८५-९० टक्के सापेक्ष आर्द्रतेला शीतगृहात साठविली असता फळांचे आयुष्य ४ आठवड्यांपर्यंत मिळते.
फळे व भाजीपाल्यांच्या साठवणीसाठी शीतकक्ष
फळे व भाजीपाल्याची नासाडी टाळण्यासाठी उत्पादक आपल्या शेतात साठवणीसाठी शीतकक्ष स्वत: बांधू शकतो. त्याला शून्य उर्जेवर आधारित शीतकक्ष असे म्हणतात. कारण या शीतकक्षात फळे आणि भाजीपाला साठविताना कसल्याही प्रकारचे यांत्रिक, रासायनिक आणि विद्युत ऊर्जेची आवश्यकता नाही. हा शीतकक्ष बांधायला अत्यंत सोपा आणि आर्थिकदृष्ट्या स्वस्त असा आहे.
शीतकक्षाची रचना कशी करावी
बाष्पीभवनाने थंडपणा निर्माण करणे या तत्वावर शीतकक्षाची रचना केली आहे. शीतकक्ष सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तूपासून बनविता येतो. या वस्तू खालीलप्रमाणे आहेत. विटा, वाळू, बांबू, वाळा आणि वाया गेलेली पोती. या शीतकक्षाची रचना एका छोट्या हौदासारखी असते. विटांचा एक थर देऊन कक्षाचा तळाचा भाग रचावा. दोन विटांमधील अंतरात बारीक वाळू भरावी. त्यानंतर विटांच्या दोन भिंती रचून त्या दोन भिंतीमधील अंतर ७.५ सें.मी. ठेवावे. दोन भिंतीमधील अंतर सुध्दा वाळूने भरुन घ्यावे. अशा रितीने वाळू आणि विटांच्या सहाय्याने हौद तयार करुन घ्यावा. या हौदावर झाकण्यासाठी बांबूमध्ये पोत्यावर वाळा पसरुन आणि सुतळीने बांधून घेऊन झाकण तयार करावे. वाळा नसल्यास नारळाच्या झावळ्या वापराव्यात. अशा रितीने शीतकक्ष बांधून तयार होतो. शीतकक्ष शक्यतो झाडाखाली किंवा छपराखाली बांधावा. दररोज सकाळी आणि संध्याकाळी असे दिवसातून दोन वेळा शीतकक्षाच्या भिंतीच्या बाहेरील बाजूने पाणी शिंपडावे आणि भिंत चांगली ओली करावी. ज्याठिकाणी पाण्याची कमतरता आहे अशा ठिकाणी शीतकक्षापासून थोड्या जवळ अंतरावर एका ठराविक उंचीवर प्लास्टिकचा पिंप ठेवून पिंपात पाणी भरावे. पिंपाला पाईप जोडून शीतकक्षाच्या वरील बाजूस असलेल्या वाळूवर पाईप ठेवून त्याला ठिबक संचाच्या छोट्या नळ्या जोडाव्यात म्हणजे पाण्याची बचत होते.
शीतकक्षातील तापमान आणि आर्द्रतेचे नियंत्रण
दिवसातून दोन वेळा पाणी शिंपडण्याने विटा थंड होतात. शीतकक्षात साठविलेल्या फळे आणि भाज्यांचे श्वसनामुळे आणि इतर रासायनिक क्रियामुळे उष्णता निर्माण होते. विटावर पाणी शिंपडल्याने ही उष्णता बाहेर काढून घेतली जाते आणि शीतकक्षात गारवा निर्माण होतो. नियमितपणे शीतकक्षावर दोन वेळा पाणी मारल्यास कडक उन्हाळ्यामध्ये शीतकक्षातील तापमान हे बाहेरच्या तापमानापेक्षा १५ ते १८ अंश सेल्सिअसने कमी असते. हिवाळ्यात सुध्दा बाहेरच्या तापमानापेक्षा शीतकक्षातील तापमान ५ अंश सेल्सिअसने कमी असते शीतकक्षात वर्षभर सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण हे ८५ ते ९५ टक्के असते. त्यामुळे कमी तापमान आणि जास्त आर्द्रता या दोघांचा एकत्रित परिणाम होऊन फळे आणि भाज्यांचे आयुष्य वाढते. फळे आणि भाज्या ताज्या, टवटवीत आणि आकर्षक राहतात. शिवाय त्यांच्या वजनातील घट अत्यल्प असते, फळांची पिकण्याची प्रकिया मंद गतीने आणि एकसारखी होते.
शीतकक्षात फळे आणि भाज्या कशा साठवितात?
काढणीनंतर खरचटलेली, तडा गेलेली, दबलेली फळे आणि भाज्या बाजूला कराव्यात. फळे आणि भाज्या प्रतवारीनंतर प्लास्टिकच्या क्रेटमध्ये ठेवून ते शीतकक्षात ठेवावे आणि वरुन झाकण ठेवावे. नियमितपणे दिवसातून दोन वेळा पाणी बाहेरच्या बाजूने मारावे. शीतकक्षात आंबा, संत्री आणि बोरांचे आयुष्य अनुक्रमे ८, २७ आणि १२ दिवसाने वाढल्याचे दिसून आले आहे. सर्वसाधारण खोलीच्या तापमानाला या फळांचे आयुष्य अनुक्रमे ४,७ आणि ५ दिवस इतके असते. कोथिंबीर, पुदिना आणि राजगिरा एप्रिल, मे महिन्यामध्ये खोलीच्या तापमानाला फार तर १ दिवस टिकतात. परंतु, शीतकक्षात त्यांची साठवणक्षमता ३ दिवसांपर्यंत वाढते. शिवाय या पालेभाज्या हिरव्यागार ताज्या आणि टवटवीत राहतात. भेंडी खोलीच्या तापमानाला १ दिवस टवटवीत राहते. परंतु, शीतकक्षात ती ६ दिवस टिकते. तसेच गाजर,मुळा आणि कोबी शीतकक्षात साठविल्याने अनुक्रमे १०, १२ आणि १२ दिवसांपर्यंत ताज्या राहतात. बाजारात भाव चांगले मिळतात, आवक कमी व्हायला लागली की उत्पादक आपला माल केव्हाही विक्रीसाठी काढू शकतो.