Soyabin lagvad mahiti in marathi E
सोयाबीन अर्थचक्र

सोयाबीन अर्थचक्र

जमीन
मध्यम काळी पोयटयाची, चांगली निचरा होणारी.

पूर्वमशागत
एक नागरंट, दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभूशीत करावी.

सुधारित वाण
जे.एस. ३३५, एम.ए.सी.एस. ११८८, फुले कल्याणी (डी.एस. २२८), जे. एस. ९३०५, के. एस. १०३, फुले अग्रणी, (केडीएस ३४४) आणि फुले संगम (केडीएस ७२६)

पेरणी व लागवडीचे अंतर
पेरणी खरीपात जुनच्या पहिल्या पंधरवड्यात वापशावर करावी. भारी जमिनीत पेरणी ४५ से.मी x ५ सें.मी. आणि मध्यम जमिनीत ३० सें.मी. x १० सें.मी. अंतरावर करावी.

बियाणे
सलग पेरणीसाठी ७५-८० किलो प्रति हेक्टर तर टोकण करण्यासाठी ४५-५० किलो प्रति हेक्टर बियाणे वापरावे.

बीजप्रक्रिया
बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी प्रति किलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा चोळावे. तसेच नत्र स्थिरीकरणासाठी सोयाबीन गटाचे रायझोबियम २५० ग्रॅम + स्फुरद विरघळविणारे जीवाणू २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास चोळावे.

आंतरपिके
सोयाबीन + तूर (३:१) या प्रमाणात घ्यावे.

खत मात्रा
भरखते : चांगले कुजलेले शेण खत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी १२ ते १५ टन वापरावे.
वरखते : सोयाबीन पिकास हेक्टरी ५० किलो नत्र, ७५ किलो स्फुरद आणि ४५ किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. खते पेरणीपुर्वी जमिनीत मिसळून द्यावीत, अथवा दोन चाड्याच्या पाभरीने खते व बियाणे एकाचवेळी पेरून द्यावे.

आंतरमशागत
तणांच्या बंदोबस्तासाठी पेरणीच्या वेळी प्रति हेक्टरी पेंडिमेथैलीन १.० ते १.५ किलो क्रियाशील घटक ६०० ते ७०० लिटर पाण्यामध्ये मिसळून जमिनीवर फवारावे. पीक उगवणीनंतर १५ ते २० दिवसांनी एक कोळपणी व नंतर खुरपणी करून शेत तण मुक्त ठेवावे. अथवा पीक उगवणीनंतर २१ दिवसांनी प्रति हेक्टरी इमॅझेथायपर क्रियाशील घटक ०.१ ते ०.१५ किलो ५०० ते ६०० लिटर पाण्यामध्ये मिसळून तणांवर फवारावे.

पाणी व्यवस्थापन
पिकाला फांद्या फुटताना (पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी), फुलोऱ्यात असताना (पेरणीनंतर ४५ ते ५० दिवसांनी) पावसाने ताण दिल्यास पाण्याच्या पाळ्या घ्याव्यात.

रोग
तांबेरा या बुरशीजन्य रोगामुळे पानांवर तपिकिरी रंगाचे ठिपके येतात व पाने तपकिरी पडतात. आर्द्रतायुक्त हवामान, वारा, रोपांची जास्त संख्या यामुळे पिकात हवा खेळण्याचे कमी झालेले प्रमाण या बाबी रोगास आमंत्रित करतात. या रोगाने शेंगा पिवळसर तपकिरी पडतात. बऱ्याचवेळा अकाली पानगळ होते. दाण्यांच्या वजनात लक्षणीय घट होते व हेक्टरी उत्पादन घटते. तांबेरा प्रभाविता भागात (सांगली, कोल्हापुर व सातारा) पेरणी शक्यतो १५ ते २५ जुनच्या दरम्यान करावी. फुले अग्रणीसारखी रोगास बळी न पडणारा वाण वापरावा. प्रोपीकानॅझॉल या बुरशीनाशकाची फवारणी १ लिटरला १ मिली या प्रमाणात करावी. पिकाच्या अवस्थेनुसार १-२ फवारण्या १५ दिवसाचे अंतराने गरजनुसार घ्याव्यात.

काढणी
सोयाबीनच्या शेंगांचा रंग पिवळट तांबुस झाल्यानंतर, जातीच्या पक्वतेच्या कालावधीनुसार १०० ते ११० दिवसांत काढणी करावी. पीक काढणीस उशीर झाल्यास शेंगा फुटण्यास सुरुवात होते.

उत्पादन
सोयाबीन पिकाचे उत्पादन २० ते २५ क्विंटल प्रति हेक्टरी मिळते.