![]() |
|
जवस बीज प्रक्रिया
|
जवस हे रब्बी हंगामातील महत्वाचे तेलबिया पीक असून त्याचा उपयोग तेल व धागा निर्मितीसाठी केला जातो. जवस हे अतिशय पौष्टिक असून त्यामधून आठ प्रकारची प्रथिने,कर्बोदके,जीवनसत्वे व खनिजे मिळतात,तसेच जवसाच्या तेलामध्ये 58% ओमेगा-3,ओमेगा-6, कोलेस्ट्रोल आणिअँटिऑक्सिडंट आहेत.जवस तेलाच्या एकूण उत्पादनापैकी 20% खाद्यतेल म्हणून, तर 80% तेलाचा औधोगिक क्षेत्रात साबण, पेंड, व्हॉर्निस, शाई तयार करण्यासाठी, तसेच जवसाची ढेप दुभत्या जनावरांसाठी उत्तम खुराक आहे. जवसाच्या कड्यापासून तयार होणार्या धाग्याची प्रत चांगली असल्यामुळे त्याचा पिशव्या, कागद व कपडे तयार करण्यासाठी उपयोग होतो.
महाराष्ट्र राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा विभागात जवस हे पीक रब्बी हंगामात घेतले जाते. जवसाच्या 80 टक्के उत्पादनाचा तेल काढण्याकरिता व 20 टक्के धागा काढण्याकरिता उपयोग केला जातो. जवसाच्या अधिक उत्पादनासाठी शुद्ध व जातिवंत बियाणे असणे गरजेचे असते जसे की ’शुद्ध बिजोपोटी फळे रसाळ गोमटी ‘ ह्या कथना प्रमाणे जातिवंत बी हे फार महत्वाचे आहे. कारण पिकाची वाढ व उत्पादन हे वापरलेल्या बियाणावरच अवलंबून असते म्हणून विविध वाणांचे बीजोत्पादन शास्रोक्त पद्धतीने करणे आवश्यक आहे.
जवसाचे बीजोत्पादन तंत्रज्ञान :
बीजोत्पादन कार्यक्रमाची प्रमाणीकरणासाठी नोंदणी:
जवसाच्या बीजोत्पादन कार्यक्रमाची प्रमाणीकरण करावयाचे असल्यास विकत घेतलेले बियाणे (अधिकृत उत्पादक) जिल्हा प्रमाणीकरण यंत्रणेच्या कार्यालयात दाखवून व बीजोत्पादन कार्यक्रमाची रीतसर नोंदणी करून नंतरच त्यांच्या परवानगीने व मार्गदर्शनाने बीजोत्पादन कार्यक्रमाची पेरणी करावी.
जमीन:
जवस हे पीक मध्यम ते भारी, ओलावा टिकवून ठेवणारी, उत्तम निचर्याची, आम्ल-विम्ल निर्देशांक 5 ते 7 दरम्यान असणार्या जमिनीत लागवडीस उत्तम असते.
हवामान:
जवस हे पिक मुख्यत्वे रब्बी हंगामातील असून या पिकाच्या वाढीसाठी 20 ते 30 अंश से तापमान आवश्यक असते. या पिकास फुलोरा व त्यानंतरच्या अवस्थेत जास्त कोरडे व उच्च तापमान ( 32 अंश से) असल्यास उत्पादनामध्ये लक्षणीय घट संभवते.
पूर्वमशागत:
प्रथम जमिनीची खोल नांगरट करून एक कुळवाची पाळी द्यावी. त्यानंतर काडीकचरा वेचून घेऊन शेवटच्या वखरणीपूर्वी हेक्टरी 10 गाड्या चांगले कुजलेले शेणखत पसरुन मिसळावे.
पेरणीची वेळ:
जवसाची पेरणी ऑक्टोबरच्या दुसर्या व तिसर्या आठवड्यात करावी आणि दोन ओळींतील 30 सेंमी अंतर ठेवून करावी. पेरणी 5 ते 7 सेंमी पेक्षा अधिक खोल करू नये.
बियाणाचे प्रमाण:
जवस पिकार्चें भरपूर बीजोत्पादन मिळण्यासाठी प्रति हेक्टरी 4.5 ते 5 लाख रोपांची संख्या असणे आवश्यक आहे. त्यासाठी शिफारस केलेले शुद्ध प्रमाणित, टपोरे व निरोगी बियाणे प्रति हेक्टरी 12 ते 15 किलो वापरावे.
बीजप्रक्रिया:
पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास कार्बेर्न्डेंझिम 1.5 ग्रॅम किंवा थायरम 3 ते 3.5 ग्रॅम लावावे.
खत व्यवस्थापन:
रासायनिक तसेच सेंद्रिय खते जवसाच्या उत्पादनवाढीस महत्वाचे कार्य करीत असतात. कोरडवाहू जवसाकरिता 25 किलो नत्र, 25 किलो स्फुरद प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळेस द्यावे. तसेच बागायती लागवडीसाठी 60 किलो नत्र, 30 किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे, अर्धा नत्र (30 किलो) + संपुर्ण स्फुरद (30 किलो) पेरणीच्या वेळी द्यावे, तसेच राहिलेल्या अर्ध्या नत्राची मात्रा (30 किलो नत्र) 40 ते 45 दिवसांनी द्यावी.
पाणी व्यवस्थापन:
जवस हे पीक पाण्यास उत्तम प्रतीसाद देणारे आहे. या पिकास दोनदा पाणी देणे आवश्यक आहे. पहिले पाणी पीक फुलोर्यात असताना म्हणजेच 40 ते 45 दिवसांनी आणि दुसरे पाणी 65 ते 70 दिवसांनी (बोंर्डें धरण्याच्या वेळेस) द्यावे.
आंतरमशागत:
जवसाचे पीक पहिल्या 35 दिवसांपर्यंत तणविरहित ठेवावे. पेरणीनंतर 25 दिवसांनी पहिली डवरणी करावी.
पीक संरक्षण
गादमाशी:
गादमाशीचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी पिकाची पेरणी ऑक्टोबर महिन्यात करावी. या माशीच्या नियंत्रणासाठी 30% प्रवाही डायमेथोएट 10 मि.ली. 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
भुरी:
या रोगाचा प्रसार हवेद्वारे होतो. या रोगाच्या नियंत्रणाकरिता पाण्यात मिसळणारी गंधकाची भुकटी 25 ग्रॅम किंवा कॅराथेन 10 मि.ली. 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
अल्टार्नेरिया ब्लाइट:
या रोगाचा प्रसार बियाणाद्वारे होतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी थायरम किवा कार्बेनडाझिम 3 गॅ्राम प्रति किलो बियाण्यासोबत बीजप्रक्रिया करावी. तसेच या रोगाचे लक्षण दिसताच मॅन्कोझेब 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मर:
या रोगाचा प्रसार बियाण्याद्यारे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी पिकाची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करावी. तसेच या रोगाच्या नियंत्रणाकरिता ब्रासिकोल किंवा थायरम 3 ग्राम प्रती किलो बियाण्यासोबत बिजप्रक्रिया करावी.
काढणी व मळणी:
पिकाची पाने व बोंडया पिवळ्या रंगाची झाल्यावर जवस पीक काढणीस योग्य असे समजावे. पिकाची पाने व बोंडया पिवळ्या रंगाची झाल्यावर काढणी करावी. एक महत्वाची बाब म्हणजे बीजप्रमाणीकरण यंत्रणेच्या अधिकार्याच्या परवानगीने पिकाची कापणी विळ्याच्या साह्याने करावी आणि त्यानंतर 4 ते 5 दिवस सूर्यप्रकाशात वाळवून नंतर मळणी करावी. उत्पादित बियाणे स्वच्छ करून वाळवावे व बियाणामध्ये ओलावा 10 टक्कयांपर्यंत आल्यास वाळविणे थांबवावे व निर्जंतुक केलेल्या पोत्यात भरून कोरड्या हवेत त्याची साठवणूक करावी.
बीजोत्पादन घेताना घ्यावाची काळजी
दोन वाणांमधील विहित अंतर (विलगीकरण अंतर):
जवस पिकामध्ये परागीभवनाचे काम मधमाश्या व इतर कीटकांमार्फत होत असते. म्हणून एखाद्या वाणाची गुणवत्ता व शुद्धता कायम टिकवायची असेल तर त्याचे बीजोत्पादन करताना सर्व बाजूंनी कमीत कमी दोन वाणांमधील अंतर पायाभूत बियाणे बीजोत्पादनासाठी 50 मीटर व प्रमाणित बियाणे बीजोत्पादनासाठी 25 मीटर अंतर ठेवावे.
भेसळ झाडे काढणे:
पिकाच्या निवडलेल्या वाणांची अनुवंशिकता, शुद्धता राखण्यासाठी भेसळयुक्त झाडे काढणे गरजेचे आहे. यामध्ये त्याच पिकाच्या इतर वाणांची झाडे, रोगट झाडे, इतर पिकाचे झाडे, हानिकारक पिकाची झाडे यांचा समावेश होतो. अशी वेगवेगळ्या प्रकारची संशयित झाडे आढळून आल्यास ती काढून टाकावीत. याशिवाय दोन ओळीमध्ये उगवलेली झाडेसुद्धा उपटून टाकावीत.
आक्षेपार्ह रोगांची झाडे काढणे:
मुळकूज व मर या रोगांचा प्रसार बियाणामार्फत होतो, म्हणून या रोगांची लक्षणे दिसताच रोगट झाडे काढून टाकावीत. जवसाचे बीजोत्पादन करीत असताना ठराविक वेळेवर प्रक्षेत्र तपासणी करिता बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे अधिकारी प्रक्षेत्रावर वारंवार येत असतात.
प्रक्षेत्र तपासणी:
या पिकाची प्रक्षेत्र तपासणी तीन टप्प्यांमध्ये आहे.
1.पीक फुलोऱ्यात येण्याआधी .
2.पिक फुलोऱ्यात असताना.
3.पिकाच्या बोंडया पडल्यानंतर.
जवस पिकाची बियाणे प्रमाणित होण्यासाठी लागणारी गुणवत्ता
जवसाची सुधारित वाणे व त्यांची वैशिष्टये
अ.क्र.सुधारित वाणाचे नाव कालावधी (दिवस) तेलाचे प्रमाण % उत्पादन
(कि./हे.)विशेष गुणधर्म
1.लातूर जवस-93 90-95 40 800-1600 लवकर तयार होणार, कमी लागवड अंतरासाठी, कोरडवाहू लागवडीसाठी, मर, भुरी, अल्टार्नेरिया रोगास व गादमाशी किडीस प्रतिकारकक्षम
2.एन.एल.-97 115-120 42 600-1200 मर, भुरी, अल्टार्नेरिया रोगास व गादमाशी किडीस प्रतिकारकक्षम
3.एन.एल.-260 111-115 43 1500-1600 मर, भुरी, अल्टार्नेरिया रोगास व गादमाशी किडीस प्रतिकारकक्षम
4.शारदा (कोरडवाहुसाठी) 100-105 41 800 मर, भुरी, अल्टार्नेरिया रोगास व गादमाशी किडीस प्रतिकारकक्षम.